खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचा भव्य शुभारंभ

  • खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचा भव्य शुभारंभ
  • माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांची प्रमुख उपस्थिती
  • ठाणे जिल्ह्यातील एक लाख खेळाडू सहभागी होणार
  • यंदा पोहणे, हाफ मॅरेथॉन, अंडरआर्म क्रिकेट, बैलगाडा शर्यतीचा समावेश ।

प्रमोद कुमार

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघातले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पेनतून साकारलेल्या खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचा शानदार शुभारंभ सोहळा आज ठाण्यात पार पडला. यंदा खासदार क्रीडासंग्रामचे दुसरे वर्ष आहे. येत्या १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे हा महोत्सव होणार असून यात १ लाख खेळाडू सहभागी होतील. या शुभारंभ सोहळ्याला खासदार डॉ. शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, भारताचा माजी क्रिकेटपटू व खासदार हरभजनसिंग आणि विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, खासदार क्रीडासंग्राम ही केवळ स्पर्धा नसून प्रेरणादायी चळवळ आणि तरुणाईला योग्य दिशेने नेणारी संकल्पना आहे. इनडोअर, आऊटडोअर खेळांसोबतच लेझीम, प्रो गोविंदा, ढोलताशा स्पर्धा अशा भारतीय खेळांचाही यंदा खासदार क्रीडासंग्राममध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होऊ शकतील, असे ते म्हणाले. गोविंदा उत्सवाला खेळाचा दर्जा देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वर्षानुवर्ष सराव करणाऱ्या गोविंदांना प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होता येईल, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या वर्षी खासदारांना सांसद खेल महोत्सव आयोजित करण्याचे आवाहन केले. मात्र याची सुरुवात गेल्या वर्षीपासून आपण खासदार क्रीडासंग्राम आयोजित करत आहोत, असे ते म्हणाले. मागील वर्षी या महोत्सवात ३० हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यंदा एक लाख खेळाडू सहभागी होतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. खेळ व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, संघभावना, मेहनत आणि आत्मविश्वास वाढवतो. देशाच्या प्रगतीत खेळांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे ते म्हणाले. खेलो इंडिया”, “फिट इंडिया मूव्हमेंट” सारख्या उपक्रमांमुळे भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तर गाठत आहेत. नवे खेळाडू, नवी ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वास दिसणार आहे. कल्याण मतदारसंघाला क्रीडाक्षेत्रात नवे स्थान मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे, असे ते म्हणाले. स्थानिक खेळाडूंना खासदार क्रीडासंग्रामच्या निमित्ताने मोठ्या मंचावर चमक दाखवण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले. या महोत्सवाची विस्तृत माहिती ९३३८५६७५६७ क्रमांकावर उपलब्ध आहे. या क्रमांकाला मिस्ड कॉल दिल्यास एक लिंक पाठवली जाईल, ज्यात महोत्सवातील स्पर्धेची माहिती मिळेल, असे ते म्हणाले. यातील सहभागी खेळाडूंना त्यांच्या सुरक्षेसाठी जीवन विमा देखील काढण्यात येणार आहे. तर त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खेळाडूंना शिष्यवृत्ती देखील देण्यात येणार आहे.

  • खासदार क्रीडासंग्राम महोत्सव
  • कालावधी – १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५
  • ठिकाण – अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे आयोजन होणार आहे.बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बुद्धिबळ, बॉक्सिंग, रायफल शूटिंग, कॅरम, ऍथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, मल्लखांब, व्हॉलीबॉल, आर्चरी, टग ऑफ वॉर, पोहणे, हाफ मॅरेथॉन, अंडरआर्म क्रिकेट, बैलगाडा शर्यत इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात येणार आहेत.