कल्याण शीळ मार्गावरील पलावा येथील अर्धवट पुलाच्या कामाविरोधात व सत्ताधारी पक्षाच्या खोट्या आश्वासनाविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसेचे जोरदार निषेध आंदोलन!

  • कल्याण शीळ मार्गावरील पलावा येथील अर्धवट पुलाच्या कामाविरोधात व सत्ताधारी पक्षाच्या खोट्या आश्वासनाविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसेचे जोरदार निषेध आंदोलन!
डोंबिवली : आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, डोंबिवली व कल्याण ग्रामीण विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कल्याण-शीळ मार्गावरील पलावा येथे मागील आठ वर्षांपासून अर्धवट लटकलेल्या व बंद पडलेल्या पुलाच्या कामाविरोधात जोरदार निषेध आंदोलन केले.
या अर्धवट पुलामुळे परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते असून, त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्राफिक कोंडीमुळे कधी कधी शाळेच्या प्रशासनाला सुट्टी देखील देण्याची वेळ आली आहे. या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे तासांतास नागरिकांना या वाहतूक कोंडीत अटकून राहावे लागते.नागरिकांना सत्ताधारी पक्षाकडून या पुलाच्या उद्घाटनाबाबत यापूर्वी अनेक वेळा खोट्या तारखा सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात आली. 31 मे रोजी पूल सुरू होईल, असे दिलेले आश्वासन देखील अपूर्ण राहिले. ही गंभीर फसवणूक लक्षात घेता, नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील, तसेच मनसेचे डोंबिवली व कल्याण ग्रामीण येथील पदाधिकारी यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दात टीका केली व पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की “सामान्य जनतेसाठी आम्ही सदैव एकत्र आहोत!”

ही लढाई कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून, सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठीची आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना – हे दोन्ही पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र लढण्यास कटिबद्ध आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : दिपेश पुंडलिक म्हात्रे