२७ गावांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी अतिरिक्त २५० कोटींची मागणी । खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसमवेत मंत्रालयात बैठक ।

२७ गावांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी अतिरिक्त २५० कोटींची मागणी ।

खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसमवेत मंत्रालयात बैठक ।

 

प्रमोद कुमार

कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला अधिक गती देण्यासाठी आणि काम उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी वाढीव २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याबाबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासमवेत शुक्रवारी मंत्रालयात बैठक पार पडली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे २७ गावांचा कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. यानंतर येथील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा देखील महापालिकेत समावेश करत त्यांना मोठा दिलासा देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता २७ गावांतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लागावा यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून २७ गावातील  नागरिकांना घरोघरी मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. या योजनेची कामे अधिक जलदगतीने व्हावी यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे २५० कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी केली. याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या समवेत मंत्रालयात आढवा बैठक पार पडली. याबैठकी दरम्यान पाणी पुरवठा योजना जलदगतीने राबविण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीत या मुद्द्यांवर ही चर्चा करण्यात आली :-

– राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बायोरेमेडिएशन पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे नियोजित करण्यात येत आहे. सुमारे ७८ कोटी रुपयांचा निधी तून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

– २७ गावे कल्याण डोंबिवली महानगरपालिका हददीत समावेश झाल्यामुळे स्थानिक संस्था करापोटी वाढीव अनुदान देण्यात यावे. २०२३-२०२४ व २०२४-२०२५ कालावधीतील कल्याण डॉविबली मनपा हददीतील प्राप्त झालेल्या १ टक्के मुद्रांक शुल्क अधिभार रक्कम महापालिकेला देण्यात यावी.

– डोंबिवली मोठागाव ठाकुर्ली येथील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील फाटक क्रमांक १ ऐवजी प्रस्तावीत चौपदरी उड्डाणपुलाबाबत अर्थातच डोंबिवली मोठागाव ठाकुर्ली रेल्वे पुलाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यासाठी वाढीव निधी देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

– कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीत येणारे  रुक्मिनीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय डोंबिवली ही दोन्ही रुग्णालये शासनाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया राबविण्यात यावी यासाठी आज चर्चा करण्यात आली.

– कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आयुष रुग्णालय सुरु करण्यात यावे. जेणेकरून अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.