सोलर सिटीच्या दिशेने महापालिकेचे पुढचे पाऊल- कल्याण डोंबिवलीतील पहिल्या अत्याधुनिक सोलर हायमास्टचे आज लोकार्पण!

  • सोलर सिटीच्या दिशेने महापालिकेचे पुढचे पाऊल- कल्याण डोंबिवलीतील पहिल्या अत्याधुनिक सोलर हायमास्टचे आज लोकार्पण!
  • लवकरच संपूर्ण महापालिका क्षेत्रात बसविणार सोलर हायमास्ट!

डोंबिवली : सोलर सिटीच्या दिशेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून महापालिकेच्या विद्युत विभागाच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवलीतील पहिल्या अत्याधुनिक सोलर हायमास्टचे लोकार्पण आज महापालिकेचे उपआयुक्त संजय जाधव यांच्या हस्ते आणि अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत, फिलिप्स इंडिया कंपनीचे नॅशनल हेड श्रीकांत फणसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण पश्चिमे येथील गणपती चौकात करण्यात आले. विशेष म्हणजे विद्युत विभागाच्या पाठपुराव्याने 7.5 लाख किमतीची ही हायमास्ट फिटिंग फिलिप्स कंपनीकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फिलिप्स इंडियाकडून हा अत्याधुनिक सोलर हायमास्ट प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. रात्रीचे वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यावर अथवा एखादा मोठा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर संपूर्ण शहर अंधारात बुडून जाते. त्यावेळी रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर येतो. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात बसविण्यात येणाऱ्या या सोलर हायमास्टमुळे संपूर्ण शहर अंधारमय होणार नाही अशी माहिती यावेळी विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली .नेहमीच्या सोलर हायमास्टपेक्षा या दिव्यांचा उजेडही अधिक जास्त असून बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर दोन दिवस हे दिवे सुरू राहू शकतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. कल्याण पश्चिमेत बसविण्यात आलेल्या या हायमास्टचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये ते बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे नागरिकांची सुरक्षिततेसोबतच वीज बचतही होऊ शकणार आहे. या लोकार्पणसमयी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उपकार्यकारी अभियंता भागवत पाटील आणि फिलिप्स इंडियाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते ।