रासरंग – २०२५ नवरात्रोत्सवात गरबा रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग, सांस्कृतिक वैभवाचा सोहळा रंगात

  • रासरंग – २०२५ नवरात्रोत्सवात गरबा रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग, सांस्कृतिक वैभवाचा सोहळा रंगात
  • खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिली उत्सवाला भेट

डोंबिवली : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत यंदा पुन्हा एकदा नवरात्रोत्सवाचा जल्लोष अवतरला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “रासरंग – २०२५” हा नवरात्र महोत्सव डोंबिवलीतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर दिमाखात सुरू आहे. सातव्या वर्षात पदार्पण करणारा हा सोहळा यंदाही अधिक भव्यतेने, कलात्मकतेने आणि उत्साहाने डोंबिवलीकरांसमोर साकारत आहे. या उत्सवाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी हजेरी लावली आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. २२ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा उत्सव आजवरच्या पाच दिवसांत डोंबिवलीकरांसाठी खास आकर्षण ठरला आहे. दररोज हजारो गरबा रसिक पारंपरिक वेशभूषेत येऊन गरब्याचा, दांडियाचा आणि सांस्कृतिक वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत आहेत. रंगीबेरंगी वेशभूषा, दांडिया, पारंपरिकतेला साजेशी रचना आणि त्यावर थिरकणारे पाय यामुळे संपूर्ण मैदान नवरात्रीच्या उत्साहात न्हाऊन निघाले आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले आहेत दांडिया किंग नैतिक नागदा. त्यांच्या जल्लोषमय सूरांनी आणि तालबद्ध वाद्यसंगीताने मैदानात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनाला आनंद देत आहे. तरुणाईसोबतच वयोवृद्ध नागरिकही त्यांच्या सादरीकरणावर थिरकत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत  पाहायला मिळाले. कुटुंबासह आलेले नागरिक, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या गरब्यात सहभाग नोंदवत नवरात्रीच्या पवित्र वातावरणात रंग भरला आहे. यंदाच्या रासरंग महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक विविधतेचे दर्शन. नेत्रदीपक मंच, लखलखीत प्रकाशयोजना, गरब्याचा आनंद घेण्यासाठी प्रशस्त मैदान आणि प्रत्येक दिवशी वाढणारा नागरिकांचा सहभाग यामुळे हा सोहळा अधिकच वैभवशाली ठरत आहे. याशिवाय विविध मान्यवर, गायक यांच्या उपस्थितीमुळेही महोत्सवाची शान अधिक खुलली आहे. २०१८ मध्ये सुरू झालेला हा उपक्रम अल्पावधीतच डोंबिवली आणि परिसरातील नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा महोत्सव दरवर्षीच्या आयोजनातून डोंबिवलीच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवतो. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात होत असलेल्या “शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल” प्रमाणेच डोंबिवलीतील “रासरंग” देखील सांस्कृतिक परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरतो. या दहा दिवसांच्या नवरात्रोत्सवात केवळ गरबा-दांडिया नव्हे तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  पारंपरिक वेशभूषेत सजलेले अबालवृद्ध, नैतिक नागदा यांचे सूर, मंचावरची नेत्रदीपक रोषणाई आणि रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे रासरंग – २०२५ हा नवरात्र महोत्सव डोंबिवलीकरांसाठी अविस्मरणीय ठरत आहे. उत्साह, भक्ती, परंपरा आणि आनंदाचा संगम घडवणारा हा सांस्कृतिक सोहळा येणारे दिवस डोंबिवलीच्या नवरात्रीला अधिकच रंगतदार करणार आहे ।