-
डाउन टाउन, पलावा परिसरात अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई; १.९३ किलो एमडीसह ३ आरोपी अटकेत ।
प्रमोद कुमार
डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत तब्बल १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त करून २.१२ कोटी रुपयांच्या किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दिनांक २६ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजता करण्यात आली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी क्र. १ च्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स हस्तगत केला. पुढील तपासात आरोपीच्या सोबत राहणारे आणखी दोन साथिदार पसार झाल्यानंतर त्यांनाही रातोरात ताब्यात घेण्यात आले । अटक आरोपींमध्ये आरोपी क्र. १: २६ वर्षीय पुरुष, आरोपी क्र. २: २० वर्षीय पुरुष व आरोपी क्र. ३: २१ वर्षीय महिला यांचा समावेश आहे । तपासात असे समोर आले आहे की, अटक आरोपी हा सदर अंमली पदार्थ महिला आरोपीच्या मदतीने विक्रीसाठी साठवून ठेवत होता. या प्रकरणात गुन्हा रजि. नं ७३१/२०२५ नुसार गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८(क), २१(क), २२(क) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अंमली पदार्थ विक्री संदर्भात कोणतीही गोपनीय माहिती असल्यास मानपाडा पोलीस ठाणे किंवा अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कल्याण येथे दुरध्वनी क्र. ०२५१२-४७०१०४ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, गुन्हे निरीक्षक राम चोपडे, तसेच सपोनि कलगोंडा पाटील, सपोनि संपत फडोळ, पोशि बडे, पोशि दिघे यांनी केले ।