उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ५० कोटी मंजूर – खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

  • उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ५० कोटी मंजूर

  • – खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

  • – जीर्ण प्रशासकीय मुख्यालय इमारतीचा होणार पुनर्विकास

 

प्रमोद कुमार 

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाने उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. महापालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद म्हणून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधीचा पहिला टप्पा असून यापुढेही निधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेची प्रशासकीय इमारतीची उभारणी करता येणार आहे । उल्हासनगर शहर हे लहान मोठ्या उद्योगांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. उल्हासनगर शहर हे ठाणे जिल्ह्यातील एक मोठी घाऊक आणि किरकोळ वस्तुंच्या खरेदी विक्रीची बाजारपेठ आहे. त्यामुळे शहरात दररोज हजारो व्यापारी, ग्राहक येत जा करत असतात. या शहराला सुविधा पुरवण्याचे काम उल्हासनगर महापालिकेच्या माध्यमातून केले जाते. उल्हासनगर शहरात विविध सुविधा पुरवण्यासाठी स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे प्रयत्नशील असतात. त्यांच्या माध्यमातून शहरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. यात कॉंक्रीट रस्ते, भुयारी गटार योजना, मैदान, उद्यान विकास, क्रीडा संकूल, रूग्णालय विकास केला जातो आहे । याच उल्हासनगर महापालिकेेची प्रशासकीय इमारत गेल्या काही वर्षात जीर्ण झाली होती. अनेकदा स्लॅबचे प्लास्टर कोसळणे अशा घटना उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत समोर आल्या होत्या. त्यासाठी भरघोस निधीची गरज होती. स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्याच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी ५० कोटी रूपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिकेची प्रशासकीय इमारत भव्य उभारावी अशा सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच हा निधीची पहिला टप्पा आहे. येत्या काळात टप्प्याटप्याने इमारतीच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे । नगरविकास विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत हा ५० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या आणि पालिका प्रशासनाच्या खर्चातून आता महापालिकेची इमारत उभी करता येणार आहे. या निर्णयाबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत ।