कल्याण डोंबिवलीत ड्रग्स तस्करांविरोधात ५० गुन्हे दाखल; कल्याण पोलीसांची सहा महिन्यात कारवाई ।

  • कल्याण डोंबिवलीत ड्रग्स तस्करांविरोधात ५० गुन्हे दाखल; कल्याण पोलीसांची सहा महिन्यात कारवाई ।

डोंबिवली : कल्याण डोंबिवली मधील पोलिस परिमंडळ – ३ हद्दीत नशेखोरांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून अमली पदार्थ विरोधी कारवाई सातत्याने सुरु आहे. या मोहिमेत मागील सहा महिन्यात तब्बल ५० गुन्हे दाखल करण्यात आले आणि दिवसाआड आरोपींना गजाआड करण्याचे काम पोलिसांनी सुरू ठेवले आहे.
        अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करण्यावर बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने तस्करी केली जात असते. अशाच प्रकारे कल्याण- डोंबिवली परिसरातील चरस, गांजा, एमडी यासारख्या नशेच्या पदार्थाची विक्री करणाऱ्या ड्रग्स तस्करांवर कारवाईचा बडगा उगारत पोलीस डीसीपी स्कॉडने तब्बल ५० गुन्हे दाखल केले आहेत. तर २९ लाखाच्या अंमली पदार्थासह ६५ जणांना अटक करण्यात आली आहे. कल्याण परिमंडळ तीनचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सुरुवातीपासूनच अमली पदार्थ विरोधी कारवाई मोहीम हाती घेतली आहे. त्याला सहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या हातभार लागत आहे . तरुण पिढीला नशेच्या आहारी लोटणाऱ्या समाज कंटकांविरोधात कारवाई करत या नशेखोरांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून अमली पदार्थ विरोधी कारवाई सातत्याने सुरु आहे. या मोहिमेत मागील सहा महिन्यात तब्बल ५० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान रात्रीची गस्त वाढवत, निर्जन स्थळावर होणाऱ्या अमली पदार्थाच्या पार्त्यांवर लक्ष ठेवत, गुन्हेगारांची धरपकड करत नशेचे अड्डे उध्वस्त केले जात आहेत. त्यानुसार ऑक्टोबर २०२४ ते मे २०२५ या सहा महिन्याच्या कालावधीत कल्याण-डोंबिवली पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत २९ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ११३.७३१ कि ग्रॅम गांजा, २५८.६१ ग्राम एमडी, १० ग्राम चरस आणि कोडीनयुक्त औषधाच्या बाटल्या असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी मागील सहा महिन्यात केलेल्या या कारवाईत ५० गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या प्रकरणी ६५ आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस उपायुक्तांचे अमली पदार्थ विरोधी पथक २४ तास सक्रीय असून केवळ नशेखोरांवरच नव्हे; तर नशिल्या पदार्थाची विक्री करणाऱ्या तस्कर तसेच पुरवठादारांपर्यत पोहोचून ही साखळी तोडण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे अतुल झेंडे यांनी सांगितले ।