आगरी कोळी वारकरी भवनासाठी १५ कोटींचा निधी मंजूर

  • आगरी कोळी वारकरी भवनासाठी १५ कोटींचा निधी मंजूर
  • दुसऱ्या टप्प्यातील निधीला नगरविकास विभागाकडून मंजुरी
  • खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने भवनाची उभारणी

 

प्रमोद कुमार

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत  एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातुन दिवा येथील बेतवडे येथे ३० कोटी रुपयांच्या निधीतून आगरी कोळी वारकरी भवन उभारण्यात येत आहे. या भवनाचे काम प्रगती पथावर असून याच्या पुढील उभारणीसाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत नुकताच शासन निर्णय जाहीर झाला आहे. यामुळे भवनाचे उर्वरित काम ही जलदगतीने पूर्णत्वास जाणार असून आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडवून देणारे हे भवन नागरिकांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात पायाभूत सुविधा, महाविद्यालय, रुग्णालय यांच्या उभारणीसह आपली संस्कृतीची जपणूक करणाऱ्या विविध वास्तूंची देखील उभारणी करण्यात येत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाला विविध समाज, परंपरांचा वारसा लाभला आहे. यामुळे या मतदारसंघातील शहरांमध्ये आगरी, कोळी, वारकरी यांसारख्या विविध संप्रदायाचे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या सर्व विविध समाजातील नागरिकांच्या दृष्टीने त्या त्या भागात सांस्कृतिक भवन आणि समाज मंदिरे उभारण्याचे काम खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याच अंतर्गत कल्याण पूर्वेतील ड प्रभाग येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ज्ञान केंद्र, बेतवडे येथे आगरी, कोळी, वारकरी भवन, डोंबिवली येथे नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, कल्याण येथे हिंदी भाषी भवन, अंबरनाथ पश्चिम मेटल नगर येथे बहुउद्देशीय सभागृह, कोहोज खुंटवली येथे बहुउद्देशीय सभागृह, चिखलोली येथे सामाजिक सभागृह उभी राहत आहेत. दिवा बेतवडे येथील आगरी कोळी भवनाचे भूमिपूजन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.  तसेच भवनाच्या उभारणीसाठी पाहिल्या टप्प्यातील १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले होते. या निधीच्या माध्यमातून भवनाची इमारत  उभी राहिली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी १५ कोटी रुपयांच्या निधीला नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळाली असून उर्वरित काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे.

आगरी कोळी वारकरी भवनाची वैशिष्टय

  • सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह
  • – आगरी कोळी आणि वारकरी परंपरा दर्शविणारी दालने
  • – फोटो गॅलरी प्रशस्त पार्किंग व्यवस्था
  • – भवनात दोन्ही संस्कृतीविषयी प्रशिक्षण व्यवस्था

 

  • आगरी कोळी वारकरी भवनाच्या उभारणीसाठीच्या निधी समवेतच विटावा येथील जकात नाका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून मराठा भवनाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी देखील राज्याच्या नगरविकास विभागाकडून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मराठा भवनाची देखील उभारणी लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.