-
डोंबिवलीत रंगणार ” सिंदूरची आग..देशोदेशी जाग..” मुलाखत कार्यक्रम ।
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केलेल्या खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या अनुभवांवर आधारीत ही प्रकट मुलाखत
-
१२ जून २०२५ रोजी डोंबिवली जिमखान्यात रंगणार कार्यक्रम
प्रमोद कुमार
डोंबिवली : डोंबिवली शहरातील ४७ सहभागी संस्थांच्या वतीने नागरी अभिवादन न्यास, डोंबिवली आयोजित ” सिंदूरची आग..देशोदेशी जाग..” या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची दहशतवाद विरोधातील भूमिका जगासमोर मांडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे “खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या अनुभवांवर आधारीत ही प्रकट मुलाखत” पार पडणार आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे आणि वृत्त निवेदिका सुवर्णा जोशी हे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेणार आहेत. हा मुलाखत कार्यक्रम गुरुवार, १२ जून २०२५ रोजी, सायं. ६.३० वाजता डोंबिवली जिमखान्याच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडणार आहे. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान मधील दहशतवादी अड्डे उध्वस्त करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदुरच्या माध्यमातून भारताने जगाला थेट संदेश दिला की भारत आता दहशतवादी हल्ले सहन करणार नाही. भारताचा हाच दहशतवादाविरोधातील शून्य सहिष्णुतेचा संदेश जगभर पोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सात शिष्टमंडळांची नियुक्ती करण्यात आली. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले. खासदार डॉ.शिंदे यांनी नेतृत्व करत यूएई आणि पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन, काँगो लोकशाही प्रजासत्ताक आणि लायबेरिया या देशांना भेटी दिल्या. यादरम्यान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आपल्या शिष्टमंडळातील सदस्यांसमवेत अतिशय यशस्वी शिष्टाई करून या चारही देशांमध्ये भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद विरोधातील शून्य सहिष्णुतेची भूमिका अगदी ठामपणे मांडली. तर लायबेरिया आणि सिएरा लिओन या दोन्ही देशांच्या संसदेत जोरदार भाषण करून पाकिस्तानच्या दहशतवादी चेहऱ्याची पोलखोल केली. खासदार डॉ.शिंदे यांचा हाच अनुभव जाणून घेण्यासाठी या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी त्यांच्या अधिकृत भेटी, या देशांनी भारताला दिलेली साथ आणि तसेच काही महत्वाच्या चर्चा याबाबत सविस्तर चर्चा या मुलाखतीत घडून येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे आणि वृत्त निवेदिका सुवर्णा जोशी हे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेणार आहेत. हा मुलाखत कार्यक्रम गुरुवार, १२ जून २०२५ रोजी, सायं. ६.३० वाजता डोंबिवली जिमखान्याच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडणार आहे. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे ।