डोंबिवलीकरांसाठी ऐतिहासिक पाऊल — लवकरच सुरू होणार डोंबिवलीहून मुंबई, नवी मुंबई, वसई, विरार या ठिकाणी रो-रो सेवा!
डोंबिवली : डोंबिवली मोठागाव जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला आज अधिकृतपणे सुरुवात झाली असून, रो-रो बोटसाठी पाण्यावरील स्थानक (जेट्टी) बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यास मोठागाव येथील ग्रामस्थ व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना दिपेश पुंडलिक म्हात्रे म्हणाले, “२०१८ मध्ये या रो-रो बोट मार्गाची पाहणी तत्कालीन पालकमंत्री आणि खासदार यांच्या सोबत करण्यात आली होती. त्यानंतर मी विविध विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करत हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून सुमारे १००० कोटी रुपयांचा डी.पी.आर. (Detailed Project Report) तयार करण्यात आला. त्यातील प्राथमिक स्वरूपात ८० कोटी रुपये मंजूर झाले असून, डोंबिवली मोठागाव जेट्टीसाठी २२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आज या कामाचे भूमिपूजन होताना अत्यंत आनंद होत आहे.” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर डोंबिवलीहून मुंबई, नवी मुंबई, वसई आणि विरार या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या वाहनांसह जलमार्गाने (रो-रो बोटीने) प्रवास करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन खर्च वाचणार आहे, तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होईल. वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणार आहे आणि सागरी परिवहन क्षेत्राला मोठा चालना मिळणार आहे. डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, वसई आणि विरार यांना जलमार्गाने जोडणारा हा ऐतिहासिक प्रकल्प नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला सुलभ, वेगवान आणि पर्यावरणस्नेही बनवेल. हा प्रकल्प डोंबिवली शहराच्या विकासाच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.