-
कल्याण पूर्व,कर्पेवाडी संघर्ष सेवा संस्था राज बिल्डर्सविरोधात ॲक्शन मोडवर , बुधवारी म्हसोबा चौकात भव्य धरणे आंदोलन होणार ।
डोंबिवली : स्थानिक रहिवाश्यांना विश्वासात न घेता विकासाच्या नावाखाली वादग्रस्त जमीन बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कर्पेवाडी संघर्ष सेवा संस्थेने राज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बुधवारी, १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता कल्याण पूर्व म्हसोबा चौकात भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कामगार नेते राजेश सोनवणे यांनी दिली. राज बिल्डर्सचे राज प्रितम चतुर्वेदी आणि भोगवटदार रहिवासी यांच्यातील मूळ जमीन वाद न्यायप्रविष्ट असून न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेला असतानाही राज बिल्डर्सने वादग्रस्त जागेचा सर्वे करत रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप आहे. स्थानिक रहिवाशांनी याला विरोध केला असता, त्यांना धमकावण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. कर्पेवाडी संघर्ष सेवा संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कल्याण परिमंडळ ३ चे अप्पर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त तसेच कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनात, राज बिल्डर्सविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात राज प्रितम चतुर्वेदी यांच्यासह संबंधितांवर दाखल गुन्ह्यांचा तपास करणे, त्यांच्या अंगरक्षकांची पार्श्वभूमी तपासणे, तसेच बिल्डरकडे असलेली लायसन्सधारी पिस्तूल कशी आहे याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने, बुधवार दिनांक १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ . ३० वाजता म्हसोबा चौकात भव्य धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल, असे कामगार नेते राजेश सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनास भीमक्रांती सामाजिक संघटना, दलित पॅन्थर संघटना यांचे सह स्थनिक विविध संस्था संघटनांचा पाठींबा मिळत असून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भंडारे यांचेसह प्रसन्नजीत चहांदे, संतोष तेली, मनोज शिंदे, निनाद सर, दिलीप करपे, मायकेल, प्रमिला शिंदे, ऍड सुप्रिया करपे आदी पदाधिकारी, सदस्य अथक परिश्रम घेत आहेत ।