महावितरण अधिकार्याची झाडाझडती,आमदार राजेश मोरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली महावितरण अधिकार्याची भेट ।
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील आणि डोंबिवली शहरातील महावितरणच्या ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उघड्या डीपी, लोंबकळणार्या केबल्स, रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या डीपी बॉक्स, जमिनीवर पडलेल्या महावितरणाच्या धोकादायक केबल्स, रस्त्यात वाहतुकीला अडथळे करणारे विद्युत पोल यासारख्या समस्याबाबत आज मंगळवारी आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकार्याची भेट घेत त्यांना जाब विचारला. राज्य शासनाकडून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असतानाही कामे पूर्ण का होत नाहीत ? असा प्रश्न उपस्थीत करत आमदार मोरे यांनी अधिकार्यांची चांगलीच कान उघडणी केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सदानंद थरवळ, डोंबिवली शहर सचिव आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक बंडू पाटील , श्रीमलंग तालुकाप्रमुख चैनू जाधव, युवा सेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, कार्यालय प्रमुख प्रफुल्ल देशमुख, उपशहरप्रमुख दिनेश शिवलकर, लालचंद पाटील या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. डोंबिवलीतील चार रस्ता ते डी मार्ट रस्त्यादरम्यान सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरीक त्रासले असून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यां मार्फत सर्व्हे करत बिघाड शोधून नागरिकाची त्रासातून सुटका करण्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिले. तर ग्रामीण आणि शहरी भागात महावितरणचे पुरेसे कर्मचारी नसल्याने नागरिकाच्या समस्यांची दखल घेतली जात नाही. डीपीडीसी, एमएमआरडीए, आणि केंद्राच्या योजनेतून प्रस्तावित असलेली कामे आणि त्यांची सद्यस्थिती, वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या विद्युत पोलांचे स्थलांतरण करणे, अनेक रस्त्यालगत महावितरणच्या वाहिन्या रस्त्यावरून जात असून या तातडीने भूमिगत केल्या जाव्यात, श्री मलंग गडावरील फिडर साठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे मात्र तरीही कामे अपूर्ण आहेत. ओमकार शाळेसमोरील नाल्यातील पोल त्वरित हटविणे, सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने ही समस्या सोडविणे, डीपी बॉक्सची उघडी झाकणे, गंजलेल्या डीपीमुळे नागरिकाच्या जीवाला धोका निर्मा झाला असून ही कामे तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश आमदार मोरे यांनी दिले. या बैठकीला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा , अधीक्षक अभियंता दीपक पाटील, तसेच कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी या समस्या तातडीने सोडविण्या बरोबरच रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. डोंबिवली पश्चिमेस पूर्वेकडून वीज पुरवठा होत आहे आणि त्याच्या वीज वाहिन्या रेल्वे पटरी खालून गेलेल्या आहेत. त्यामुळे जर शॉर्ट सर्किट झाल्यास पश्चिम विभाग पूर्णपणे अंधारात राहू शकतो म्हणून डोंबिवली पश्चिमेकडील बाजूस महावितरणचे सब स्टेशन उभारण्याची मागणी अनेक वर्षापासून शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्याकडून सुरु होती. या मागणीला पूर्णस्वरूप प्राप्त झाले आहे.या सब स्टेशन साठी माणकोली पुलाजवळ जागा निश्चित करण्यात आली असून याठिकाणी ६ फिडर बसविले जातील ज्यामुळे डोंबिवली पश्चिमेला स्वतंत्र वीज पुरवठा देता येऊ शकणार आहे. ही मागणी मान्य झाल्याने डोंबिवलीकर जनतेने समाधान व्यक्त केले आहे.