- ‘ड्रग माफियांचा सळसळाट रोखण्यासाठी मोक्का हाच प्रभावी उपाय’ – डीसीपी अतुल झेंडे
डोंबिवली : अमली पदार्थांच्या जाळ्याचा धसका भरवणारी भव्य कारवाई करत कल्याण खडकपाडा पोलिसांनी तब्बल 17 ड्रग तस्करांविरोधात मोक्का अंतर्गत कार्यवाही केली आहे. विशेष म्हणजे – ठाणे जिल्ह्यात मोक्कांतर्गत ड्रग माफियांविरोधात झालेली ही पहिलीच कारवाई ठरली आहे.डीएसपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी 115 किलो गांजा, पिस्तूल, वॉकी-टॉकी संच, वाहने आणि तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने विशाखापट्टणम ते कल्याण असा अमली पदार्थाचा पुरवठा नेटवर्क उभारले होते. कल्याणजवळ बल्लानी परिसरात राहणारा गुफरान हजरान शेख हा या तस्कर टोळीचा म्होरक्या असून, त्यांच्यासह 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 4 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.ठाणे जिल्ह्यातील पोलिसांना ‘ऑपरेशन ड्रग बस्ट’ ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाधमोडे व पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने केली.या तपासात पोलिसांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आरोपींच्या ताब्यातून 62 किलो गांजा, 1 पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि 2 वॉकी-टॉकी संच चार्जरसह जप्त केले. गुफरान शेख, बाबार शेख, सुनिल राठोड, आझाद शेख, रेशमा शेख, शुभम उर्फ सोन्या भंडारी, असिफ शेख, सोनू सय्यद, प्रथमेश ननवडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिंगारदे, गणेश जोशी आणि इतर ५ आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणात आरोपींनी आर्थिक लाभासाठी संघटित गुन्हेगारी केल्याचे स्पष्ट झाल्याने, महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली.डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितले की, ‘राज्यातील ड्रग तस्करांच्या मुळावर घाव घालण्यासाठी खडकपाडा पोलिसांची ही कारवाई आदर्श ठरेल.’या संपूर्ण तपासाचा पुढील भाग सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे ।