- उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
- ‘एनडीए’कडून खासदार डॉ. शिंदेंची ‘उमेदवार प्रतिनिधी’ म्हणून नियुक्ती
- शिवसेना खासदारांच्या बैठकीत निवडणूक रणनितीवर चर्चा
- सी.पी राधाकृष्णन मोठ्या मताधिक्याने निवडून येणार

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ‘उमेदवाराचे प्रतिनिधी’ म्हणून नियुक्ती केली. या निमित्ताने ‘एनडीए’तला भाजपचा सर्वात विश्वासू आणि जुना मित्र पक्ष या नात्याने शिवसेनेचे खासदार डॉ. शिंदे यांच्यावर भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. मंगळवारी ९ सप्टेंबर २०२५ रोजी संसदेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाचे ‘एनडीए”चे उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल असलेल्या सी.पी. राधाकृष्णन यांना यापूर्वीच शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी नवी दिल्ली शिवसेना संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. या बैठकीत मतदान कसे करायचे, मतदानाची प्रक्रिया खासदारांना समजावून सांगण्यात आल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. खासदार डॉ. शिंदे यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि मंत्री राम मोहन नायडू हे ‘एनडीए उमेदवाराचे प्रतिनिधी’ म्हणून काम पाहणार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातून सलग तीनवेळा निवडून आलेल्या खासदार डॉ. शिंदे यांची संसदेत एक अभ्यासू संसदपटू अशी ओळख आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी भारताची भूमिका आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्राने पाठवलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे डॉ. शिंदे यांनी नेतृत्व केले होते. या शिष्टमंडळाने यूएई, काँगो, सिएरा लिओन, लायबेरिया या देशांना भेटी देऊन दहशतवादाविरोधात भारताची भूमिका ठामपणे मांडली होती. आंतरराष्ट्रीय मंचावर भारत सरकारच्या वतीने प्रतिनिधीत्व करताना खासदार डॉ. शिंदे यांचे नेतृत्वगुण या दौऱ्यातून अधोरेखीत झाले. या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार डॉ. शिंदे यांचे जाहीर कौतुक केले होते ।
Post Views: 55