-
कल्याण पश्चिमेतील मुख्य जलवाहिनी फुटली – दुरुस्तीच्या खड्ड्यात साचले पावसाचे पाणी ; अपघाताचा धोका कायम

डोंबिवली : कल्याण पश्चिमेला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने परिसरात सर्वत्र पाणीच पाणी पसरले आहे. ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी मोहम्मद अली चौका पुढे एसीपी कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर महापालिकेने सुमारे ८ ते १० फुटांचा सिमेंट काँक्रीट चा रस्ता खणला आहे. मात्र जलवाहिनी दुरुस्तीनंतर आठवडाभर उलटूनही या खड्ड्याचे भरणकाम करण्यात आलेले नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गाने शेकडो वाहन चालक वापर करतात, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी तातडीने खड्डा न भरल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात विचारले असता केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी मंगळवारी आवश्यक उपायोजना करून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून तत्काळ खड्डा भरण्यात येईल ,असे स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांनी मात्र कोणताही अपघात होण्यापूर्वी महापालिकेने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावरील सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान क ” प्रभाग क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात यांना या प्रकरणात संपर्क करण्याचा प्रयत्न केले असतात फोन उचलण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे जल वाहिन्यांचा खड्डा खोदला तो कधी भरणार या विषयी माहिती मिळू शकली नाही ।