भिवंडी तालुक्यातील सोनाळे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न ।

  • भिवंडी तालुक्यातील सोनाळे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न ।

प्रमोद कुमार

ठाणे : नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सोनाळे शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात, पारंपरिक व ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. त्यांच्यासह प्रांताधिकारी अमित सानप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, तहसीलदार अभिजित खोले, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंजारराव, गटशिक्षणाधिकारी संजय अस्वले, तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच मायाताई तरे व सर्व सदस्य, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य , सोनाळे हद्दीतील पोलीस पाटील,पालक व ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ, शाळेत प्रवेश पावलांचे ठसा घेवून व टिळा लावून स्वागत करण्यात आले. विविध रंगीत फुगे, रांगोळ्या व सजावट यामुळे शाळा आकर्षक सजली होती.नवागत बालके व मान्यवरांचे स्वागत लेझीम व ढोल ताश्याच्या गजरात करण्यात आले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे मन जिंकले. आज पहिल्याच दिवशी २० बालके पहिलीला दाखल झाली असून नविन प्रवेश घेतलेल्या सर्व बालकांना शालेय पाठयपुस्तके, नविन गणवेश, लेखन साहित्य, बूट व मोजे तसेच दफ्तरे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता आधारित शिक्षण मिळावे यासाठी शासन व प्रशासन सजग आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, उपक्रमशीलता आणि मूल्यमापन या सर्व बाबींमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना दाखल करून द्यावे, हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे.” मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरावी, यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. शाळा प्रवेश उत्सवासारखे उपक्रम हे समाजात शैक्षणिक जागृती घडवण्यासाठी उपयुक्त ठरतात. पालकांनी आपल्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विश्वासाने प्रवेश द्यावा, हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.” या कार्यक्रमात ग्रामस्थ व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि माता पालक गटांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठे योगदान दिले. ग्रामीण भागात शिक्षणाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आहे, हे या कार्यक्रमातून दिसून आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पुष्पावती भोईर यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक विजयकुमार जाधव यांनी मानले. यावेळी एक पेड मा के नाम या उपक्रमा नंतर्गत औदुंबर रोपट्या चें रोपण जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सव केवळ एका शैक्षणिक उपक्रमापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो ग्रामस्थांच्या एकात्मतेचा, पालकांच्या विश्वासाचा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने उचललेला महत्त्वपूर्ण पाऊल ठरला ।