-
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त डोंबिवलीतील सावरकर उद्यानात आयोजित ।
प्रमोद कुमार
डोंबिवली : सावरकर हे बहुआयामी असे व्यक्तिमत्त्व होते. लेखक, कवी, नाटककार आणि तत्त्वज्ञ होतेच पण प्रखर हिंदुत्त्ववादी विचारांचे तितकेच पुरोगामी द्रष्टे नेते होते. त्यांनी भारताबद्दल गेल्या शतकात सांगितलेल्या अनेक गोष्टी आज तंतोतंत घडताना आपल्याला दिसत आहेत. सावरकरांची आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांत दखल घेताना हिंदू देशभक्त अशीच ओळख होत असे. जातपात विरहित हिंदूंचं संघटन व्हावं ही गरज त्यांनी शतकापूर्वीच मांडली हे त्यांचं द्रष्टेपण होतं असे उद्गार सावरकर अभ्यासक आणि लेखक अक्षय जोग यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त डोंबिवलीतील सावरकर उद्यानात आयोजित कार्यक्रमात अक्षय जोग बोलत होते. “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अपरिचित पैलू आणि आजचा भारत” या विषयावर जोग यांचे भाषण झाले त्यास अनेक डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. सावरकरांना इंग्रज घाबरत होते, या संदर्भातील भारतात आणि परदेशात घडलेले अनेक प्रसंग जोग यांनी विशद करून सांगितले. त्यास डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावरकरांच्या मार्सेलसच्या समुद्रातील उडीनंतर फ्रेंच सरकारने सावरकरांना इंग्रजांच्या ताब्यात दिल्याने तत्कालीन फ्रान्स सरकारला त्या काळी त्यांच्या देशात प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले त्यातूनच सरकारविरुद्ध असंतोषची ठिणगी पडली आणि तत्कालीन फ्रान्स सत्ताधारी पक्ष पराभूत झाल्याचा इतिहास अक्षय जोग यांनी उलगडून सांगितला. हे ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले. सावरकर उद्यानात झालेल्या या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशीकांत कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष मनीषाताई राणे, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रियाताई जोशी, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, जेष्ठ नगरसेवक राहुल दामले, पप्पू म्हात्रे, निलेश म्हात्रे, विनोद काळण, माजी नगरसेविका खुशबू ताई चौधरी, रेखाताई चौधरी आणि समस्त सावरकर प्रेमी डोंबिवलीकर उपस्थित होते ।