अंबरनाथ शहरासाठी २० कोटींचा निधी मंजूर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश शहरातील उद्याने, रस्ते होणार अद्ययावत, ग्रंथालय आणि अग्नीशमन केंद्रासाठीही निधी ।

  • अंबरनाथ शहरासाठी २० कोटींचा निधी मंजूर
  • खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
  • शहरातील उद्याने, रस्ते होणार अद्ययावत, ग्रंथालय आणि अग्नीशमन केंद्रासाठीही निधी ।

प्रमोद कुमार

अंबरनाथः अंबरनाथ शहरातील उद्याने, रस्ते आणि ग्रंथालयासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने तब्बल २० कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यात पूर्व पश्चिम भागातील दोन उद्याने, पश्चिमेतील रस्ता, संयुक्त अग्नीशमन केंद्र अशा विविध कामांचा समावेश आहे. या कामांमुळे अंबरनाथमधील उद्यानांचे अद्ययावतीकरण करणे सोपे होणार आहे.अंबरनाथ शहरात नागरिकांना विरंगुळ्याची विविध केंद्र उपलब्ध व्हावीत यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने प्रयत्नीशील असतात. त्यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ पूर्वेतील पं. नेहरू उद्यान दर्जेदार पद्धतीने विकसीत झाले आहे. आज दररोज शेकडो नागरिक या उद्यानाचा लाभ घेतात. अंबरनाथ शहरात नाट्यगृह उभारणी असो वा वाचनालयांची उभारणी या दोन्हीमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील इतर उद्यानांचा चेहरामोहरा बदलण्याची मागणी डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यांच्या या मागण्या मान्य करत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नगरोत्थान महाअभियानातून अंबरनाथ शहरासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करत त्यासाठी सकारात्मक निर्णय घेतले. त्यांच्या याच प्रयत्नामुळे अंबरनाथ शहरासाठी तब्बल २० कोटी ५१ लाख रूपयांचा निधी महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. अंबरनाथ पूर्वेतील साई सेक्शन परिसरात असलेल्या उद्यानासाठी ३ कोटी ७१ लाख ५९ हजार मंजूर झाले आहेत. तर अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर हाईट्स येथील उद्यानाच्या अद्ययावतीकरणासाठी ३ कोटी ७४ लाख ९९ हजार मंजूर करण्यात आलेले आहेत. अंबरनाथच्या मध्यवर्ती भागातील मधु मंगेश कर्णिक उद्यानात ग्रंथालय उभारण्याच्या कामासाठी १ कोटी २३ लाख ६८ हजार रूपये मंजूर झाले आहेत. त्याचवेळी पश्चिमेतील सर्वोदयनगर येथील आरक्षण क्र. ८७ वर उद्यान विकसीत करण्यासाठी १ कोटी ७२ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे अंबरनाथ शहरातील चार उद्याने वेगळ्या अर्थाने विकसीत होणार आहेत.अंबरनाथ पश्चिमेतील वाधवा कॉम्पलेक्स ते नाना पाटील चौक हा रस्ता वर्दळीचा आणि महत्वाचा आहे. या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून २ कोटी ९९ लाख ४१ हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तर अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांच्या संयुक्त अग्नीशमन केंद्रासह ७० एएलपी वाहने उभी करण्यासाठी केंद्र व निवास व्यवस्था उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी २ कोटी ७२ लाख ५६ हजार मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. जांभिवलीगाव व जांभिवलीपाडा येथील हिंदू स्मशानभूमीचे नुतनीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम केले जाणार असून त्यासाठी १ कोटी ४२ लाख ७३ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.अंबरनाथ पश्चिमेतील मदनसिंग मनवीरसिंग गार्डन, वुलनचाळ येथे बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल २ कोटी ६१ लाख ९२ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या परिसराती महिला, युवक यांना या बहुद्देशीय सभागृहाचा मोठा फायदा होणार आहे. हे भविष्यातील सांस्कृतिक केंद्र ठरू शकते.