विश्वनाथ राणे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ।
डोंबिवली : कल्याण डोंबिवलीचे अभ्यासू नगरसेवक आणि मा.विरोधी पक्ष नेते विश्वनाथ राणे यांच्या संकल्पनेतून आणि मा. महापौर सौ. विनिता राणे, मा. नगरसेविका सौ. संगीता पाटील, मुकेश पाटील यांच्या सहकार्याने काल जनगणमन कॉलेजच्या भव्य पटांगणावर साजरा झालेला जागतिक महिला दिन सोहळा अविस्मरणीय असाच झाला. तब्बल 100 महिला आणि लहान मुला-मुलीनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानी डोळ्याचे पारणें फिटले. यावेळी विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय महिपतराव पवार यांचे महिलांची सुरक्षितता आणि घ्यावयाची काळजी यावर प्रबोधनात्मक भाषण झाले. जनगणमन शाळेच्या संचालिका डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे, डॉ. वंदना सुजित बोरकर आणि डॉ. रेवती तेजस जोशी या विविध क्षेत्रात डॉक्टरेट मिळविणाऱ्या प्रभागातील महिलांचा कल्याण डोंबिवलीच्या मा. महापौर सौ. विनिता राणे आणि मा. नगरसेविका सौ. संगीता पाटील यांच्या हस्ते गौरवपत्र, शाल -पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. रेल्वे लोको पायलट गणेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या रुळानुबंध या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल त्यांचा मा. विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी मा.महापौर सौ. विनिता राणे, मा.विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांची समयोचित भाषणे झाली. व्यासपीठावर विभागप्रमुख अजय पांचाळ, शाखाप्रमुख धनाजी चौधरी, विभाग अधिकारी रोहित साळुंके, महिला शाखा संघटक श्रीमती रुचिका मोरे, महिला विभाग संघटक सौ. कल्पना कांबळी, महिला शाखा संघटक सौ. तन्वी इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकसेवा समितीचे अध्यक्ष रामचंद्र परब आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या सौ.माधवी सावंत यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉ काढण्यात आला. आकर्षक पैठणी, प्रवासी बॅग, कुकर, टेबल फॅन, मिक्सर, डिनर सेट, इस्त्री अशी तब्बल 25 बक्षिसे ठेवण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार आत्माराम नाटेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ।