गांधारी पुलावरील अपघातप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद; डंपरचालकासह मालकावरही सदोष गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी ।

  • गांधारी पुलावरील अपघातप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद; डंपरचालकासह मालकावरही सदोष गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी ।

  • आमदार विश्वनाथ भोईर आणि शांताराम मोरे यांनी केली घटनास्थळाची पाहणी ।

  • अपघातातील जखमी रिक्षाचालकाचा रुग्णालयीन खर्च शिवसेना उचलणार ।

डोंबिवली : काही दिवसांपूर्वी कल्याण – पडघा मार्गावरील गांधारी पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर संबंधित डंपरचालकाला पोलिसांनी एका दिवसांतच जामीनावर सोडून दिले. इतक्या गंभीर प्रकरणात पडघा पोलिसांची ही भूमिका अतिशय संशयास्पद वाटत असून त्यांच्याकडून दोन दिवसांत डंपर चालकासह मालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर पोलिस अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली करण्यास सांगू असा सज्जड इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिला आहे. आमदार विश्वनाथ भोईर आणि शांताराम मोरे यांनी आज गांधारी पुलावरील या घटनास्थळाची आज पाहणी केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पडघा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या मंगळवारी सकाळी गांधारी पुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने रिक्षाला धडक देऊन पुलाचे कठडे तोडून नदीमध्ये पडल्याने भीषण अपघात झाला होता. यामध्ये रिक्षातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालकही गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी संबंधित डंपरचालक स्वतःहून पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. मात्र इतका मोठा अपघात होऊनही आणि एका महिलेचा जागीच मृत्यू होऊनही पडघा पोलिसांनी या डंपर चालकाला अवघ्या एका दिवसात जामीन कसा काय मिळू दिला? हा डंपर चालक इतक्या वेगाने का गाडी चालवत होता? या गाडीमध्ये अशी कोणती वस्तू किंवा सामान होते का ज्यामुळे ही बाब लपविण्यासाठी पोलिसांनी त्याला पाठीशी घातले आहे का? असे संतप्त सवाल आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी उपस्थित केले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणात पडघा पोलिसांची भूमिका आणि त्यांनी केलेली कारवाई ही नक्कीच संशयापसद वाटत असल्याचे सांगत याप्रकरणी आम्ही उद्या पोलीस अधीक्षक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहोत. येत्या दोन दिवसांत या अपघाताप्रकरणी डंपर चालकासह कंपनी मालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही पडघा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची गडचिरलोला बदली करण्यासाठी विनंती करणार असल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. दरम्यान या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. तसेच सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रिक्षाचालकाचा संपूर्ण वैद्यकीय खर्च कल्याण पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण शिवसेनेकडून केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्यासह जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, विधानसभा संघटक संजय पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, सुनील वायले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते ।